तारापूर औद्योगिक वसाहतीच्या भगेरिया केमिकल्स या कंपनीमधून गळती झालेल्या ओलियम मुळे बोईसर, खैरेपाडा, सरावली भागातील सुमारे पाच किलोमीटर परिसर बाधित झाला. हवेपेक्षा घन असणाऱ्या या रासायनिक वायूमुळे बोईसर परिसरात सफेद सादर पसरल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती. या वायु गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एम) घटना स्थळी प्रयत्नशील असून वायु गळतीचे सायंकाळी ६.४६ वाजता बंद करण्यात आले.
पूर्वी झेलित केमिकल्स नावाने कार्यरत असणाऱ्या भगेरिया केमिकल्स या कारखान्यातून दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास ओलियम या रसायनाची गळती सुरू झाली. ओलियम चा हवेशी संपर्क झाल्यानंतर त्यामधून सल्फर डाय ऑक्साईड व सल्फरस ऑक्साईड्स ची उत्पत्ती होऊन हवेपेक्षा घन असणाऱ्या सफेद रंगाच्या या वायू मुळे संपूर्ण परिसर व्यापला गेला.
आग्नेय दिशेने हवा वाहत असल्याने कॅमलिन नाका, टाकी नाका, सरावली, खैरे पाडा व बोईसर स्टेशन परिसरात नागरिकांना या वायूची बाधा झाली. डोळ्याला चुरचुरणे, डोळे लाल होणे, घशाला त्रास होणे, त्वचेला खाज येणे तसेच मळमळ होण्याची लक्षणे परिसरातील कामगार व नागरिकांना जाणून लागली. तारापूर परिसरात इस्पात उद्योगातून अशा स्वरूपाचा वायू नेहमी सोडला जात असल्याने प्रथम नागरिकांना त्याचे गांभीर्य जाणवले नाही. मात्र काही वेळेतच अनेकांना अस्वस्थ वाटू लागल्याने नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढायला सुरुवात केली.
या परिसरात असणाऱ्या तारापूर विद्यामंदिर व चिन्मय विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्यात आले तर अनेक कामगारांना वायूच्या विरुद्ध दिशेला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी जिल्ह्यातील आपत्कालीन तसेच शासकीय यंत्रणा सतर्क केल्यानंतर पोलीस, महसूल, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ओलियम मुळे निर्माण झालेला घातक वायू पसरल्याच्या ठिकाणी नागरिकांनी ओल्या फडक्याने आपले तोंड झाकून घेण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील किमान पाच कर्मचाऱ्यांना वायूची बाजार झाल्याची माहिती पुढे आली आहे.
ओलियम ची सुमारे अडीच हजार लिटर साठवणूक करण्याच्या टाकीमधून गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या वायू च्या घनतेमुळे गळतीचे ठिकाण निश्चित करणे तसेच त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. त्यामुळे तीन तासांच्या हून अधिक अवधी उलटल्यानंतर देखील वायु गळती सुरूच राहिली होती.
वायुगळती बंद करण्यासाठी प्रादेशिक प्रतिसाद केंद्र पालघर तर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले. या दलाचे ३० सदस्य घटनास्थळी दाखल होते. तसेच एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या बंबांनी देखील घटनास्थळी आपत्ती नियंत्रणा ठेवण्यास प्रयत्न केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायु प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा कार्यरत केली असून मळमळ होणे तसेच अस्वस्थ होणे याबाबतच्या तक्रारी असल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालय तसेच इतर खाजगी रुग्णालयात प्रथम उपचारासाठी गेल्याची माहिती पुढे आली आहे.
पालघर चे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी नागरिकांनी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घ्यावा तसे घाबरून जाऊ नये असा सल्ला नागरिकांना दिला आहे
सार्वजनिक सूचना
बोईसर एमआयडीसी, तारापूर, जिल्हा पालघर येथील रहिवाशांसाठी
Bhageria Industries Limited, स्थित Boisar MIDC Tarapur, जिल्हा Palghar येथे कारखान्यातील साठवण टाकीतून ओलियम (Oleum) वायूची गळती झाल्याची माहिती सर्व नागरिकांना देण्यात येत आहे.
सदर वायू वातावरणात पसरल्यामुळे काही ठिकाणी पांढऱ्या धुरासारखा / धुक्यासारखा दिसू शकतो.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणतीही घाईगडबड करू नये, ही विनंती आहे. कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित आपत्कालीन यंत्रणा व प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्परतेने कार्यरत आहेत.
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत खालील सूचना काटेकोरपणे पाळाव्यात:
करावयाच्या गोष्टी (Do’s):
•शांत राहावे व शक्यतो घरामध्येच थांबावे.
•घरातील सर्व दरवाजे व खिडक्या बंद ठेवाव्यात.
•पंखे, एसी व इतर वायुवीजन यंत्रणा तात्पुरती बंद ठेवावीत.
•अत्यावश्यक असल्यास बाहेर पडताना नाक व तोंड ओल्या कापडाने झाकावे.
•प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
•लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनविकार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
करू नयेत अशा गोष्टी (Don’ts):
•घाबरू नये किंवा अफवा पसरवू नयेत.
•कारखान्याजवळ किंवा गळती झालेल्या ठिकाणी गर्दी करू नये.
•गळतीच्या ठिकाणी जाण्याचा किंवा तपास करण्याचा प्रयत्न करू नये.
•अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये.
•आपत्कालीन सेवांच्या कामात अडथळा आणू नये.
पुढील माहिती आवश्यकतेनुसार कळविण्यात येईल. सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती. ही सूचना जनहितार्थ जारी करण्यात येत आहे. – माधव तोटेवाड सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, पालघर.